स्वेरीमध्ये बारावा ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा..!
पंढरपूर- ‘धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. यामुळे आपण भविष्यात अनेक व्याधीपासून दूर राहू शकतो. शरीराबरोबरच मन निरोगी राहण्यासाठी योगा सातत्याने करणे आवश्यक आहे. योगामुळे आपले मन स्थिर व बुद्धी चंचल रहाते आणि हाती घेतलेल्या कार्यात उत्साह वाढतो. एकूणच आरोग्यदायी जीवनासाठी योगा आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक श्री. राजेंद्र अनवते यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान व स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) व स्वेरी लॉ कॉलेज मध्ये बारावा ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक राजेंद्र अनवते हे आरोग्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन करत होते. समीर बॉम्बे चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद जोशी म्हणाले की, ‘योग साधना आपल्या मनात उतरवली पाहिजे. शरीर मनाला, मन आत्म्याला आणि आत्मा परमात्म्याला जोडण्यासाठी योग आवश्यक आहे.’ स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून स्विकारला आहे. यामुळे योगाचा सर्वांना फायदा होत आहे. पशु, पक्षी, प्राणी यांच्याकडून सकारात्मकतेने कार्य होताना आपण पाहतो. पण या भूतलावर मानवाकडून नकारात्मकतेकडे अधिक लक्ष जाते. म्हणून नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी योग सारखे उत्साहवर्धक उपक्रम सातत्याने राबवावेत. यामुळे मन स्थिर राहते आणि प्रगती झपाट्याने होते. योगामुळे अंतर्मन सुंदर बनते. यासाठी योग व प्राणायम करणे हे खुप महत्वाचे आहे.
यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, वज्रासन, भुजंगासन, पद्मासन, सुखासन, सूर्यनमस्कार अशी विविध प्रकारची आसने करवून घेतली गेली. यावेळी करकंब मधील विद्यार्थिनी अमृता सरगुले यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवून उपस्थितांची मने जिंकली. शरीराची कमालीची लवचिकता आणि सहजता या माध्यमातून अमृताने अनेक योग प्रकार सादर केले. यावेळी स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, विद्यालंकार इन्स्टिटयूट, वडाळा, मुंबईच्या प्राचार्या डॉ. संगीता जोशी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल चौंडे, उन्नत भारत अभियानचे प्रमुख प्रा. प्रशांत भागानगरे, सर्व समन्वयक, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या सूचनेनुसार जुलै २०२४ पासून नियमीतपणे प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला 'स्वेरी योगा डे' साजरा केला जातो आणि दैनंदिन वेळापत्रकात सकाळी १०:०० ते १०:३० या वेळेत स्वेरीतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून योगा केला जातो. यावेळी कोलकाता (पश्चिम बंगाल) मध्ये झालेल्या योग कार्यक्रमाचे प्रक्षेपण स्वेरीच्या प्रांगणात मोठ्या एलसीडी च्या माध्यमातून दाखविण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगाचे महत्व व मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला.



Comments
Post a Comment